नवी दिल्ली : कोविड-१९ संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्व आघाड्यांवर जबरदस्त गतीने कृती करण्याची गरज असून, आपली प्रत्येक कृती उत्तम विज्ञानावर आधारित असली पाहिजे, असे प्रतिपादन विप्रोचे संस्थापक-चेअरमन अझीम प्रेमजी यांनी केले आहे.
अझीम प्रेमजी यांनी सांगितले की, कोविड संकट ज्या गतीने पसरले आहे, त्याच गतीने आणि विश्वासाने त्याचा मुकाबला करण्याची गरज आहे. विज्ञान आणि विश्वास या आधारेच या संकटाचा मुकाबला केला जाऊ शकतो. हे संकट परत येणार नाही, याची खबरदारीही आम्हाला घ्यावी लागेल. प्रेमजी यांनी म्हटले की, एकूणच सर्व परिस्थिती हृदय विदीर्ण करणारी असली तरी आपल्याला कमजोरांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. खेडी आणि गरिबांची विशेष काळजी घ्यावी लागेल. केवळ साथच लोकांची जीवने उद्ध्वस्त करीत नसून साथीच्या आर्थिक परिणामांनीही लोक उद्ध्वस्त होत आहेत.प्रेमजी यांनी सांगितले की, या संकटाचा निपटारा करताना जे अधिक दुर्बल आहेत, त्यांना आधी प्राधान्य दिले गेलेच पाहिजे. कारण त्यांना पहिली गरज आहे. संकटातून बाहेर येत असतानाच समाज आणि अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करून देशातील असमानता आणि अन्याय आपल्याला दूर करावी लागेल.