ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 3 - बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे (Janata Dal United) राष्ट्रीय अध्यक्ष नितीशकुमार यांनी "एनडीए"चे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समर्थन दिल्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. मात्र, यासंदर्भात नितीशकुमार यांनी आपली ""मन की बात"" सर्वांसमोर ठेवली.
नितीशकुमार म्हणाले की, ""मी लालू प्रसाद यादव यांच्या दबावाखालीही नाहीय तसंच मी भाजपाच्याही जवळ नाही. माझ्याबाबत बरेच काही बोलले जात आहे, अनुमान लावले जात आहेत. या सर्व गोष्टी निरर्थक आहेत. मी केवळ बिहारच्या राजकारणात राहून येथील विकासासाठी काम करत राहणार, हाच माझा संकल्प आहे. बिहारमध्ये आम्ही स्वतःचे स्थान बळकट करत आहोत. बाहेरील राजकारणाबाबत अद्याप विचार केलेला नाही. केवळ घोषणाबाजी केल्यानं कुणी पंतप्रधान होत नाही"".
यावरुन येथील महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रीय जनता दल-जदयूच्या नात्यात दुरावा आला असून जदयू-भाजपाची जवळीक वाढत असल्याच्या चर्चा देशातील राजकारणात रंगत आहेत. पुढे ते असेही म्हणाले की, स्वातंत्र्याच्या लढाईत भाजपाची कोणतीही भूमिका नाही. मात्र तरीही सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत.
उत्तर देणं मलाही येतं पण...
नितीश कुमार असेही म्हणाले की, रामनाथ कोविंद यांना समर्थन दर्शवल्यानंतर अनेक आरोप करण्यात आले. मला यावर उत्तर देता येत नाही का?. मात्र युतीमुळे गप्प आहे. कोविंद यांनी चहापानासाठी बोलावले होते. ही बाब मी लालू प्रसाद यादव व अशोक चौधरी यांना सांगितली होती. त्यानंतर मी राजभवनात गेलो. मला तर 22 जून रोजी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी व्हायचे होते मात्र पाटणामध्ये इफ्तार पार्टीदरम्यान गुलाम नबी आझाद काय-काय बोलले? या कारणामुळे मी गेलो नाही.
तुम्हाला जे करायचे आहे ते करा, मी तत्त्वांसोबत तडजोड करु शकत नाही. उगाचच गोड-गोड बोलणारा मी नाही. जे होणार आहे, ते होणारच. मी काम करण्यावर विश्वास ठेवतो, असे सांगत नितीश कुमार यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. पुढे ते काँग्रेस पार्टीला उद्देशून असेही म्हणाले की, त्यांना कोणासोबत भिडायला हवे आहे आणि ते भिडत कुणाशी आहेत. माझ्या तत्त्वांत नाही, तुम्ही (काँग्रेस) बदलत आहात.