Silkyara Tunnel Collapse : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 41 कामगार बोगद्यात अडकले असून, त्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेशी अदानी समूहाचे (Adani Group) नाव जोडण्यात येत आहे. यावर अदानी समूहाने स्पष्टीकरण दिले आहे. बोगद्याच्या बांधकामात अदानी समूहाचा किंवा आमच्या कोणत्याही उपकंपनीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही, असे अदानी समूहाकडून सांगण्यात आले आहे.
बोगदा तयार करणारी कंपनी अदानी समूहाची आहे, अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अदानी समूहाने आज एक निवेदन जारी केले आहे. “आमच्या निदर्शनास आले आहे की, उत्तराखंडमध्ये बोगदा कोसळलेल्या घटनेशी आमचा संबंध जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. तसेच, आम्ही स्पष्ट करू इच्छितोत की, बोगद्याच्या बांधकामात अदानी समूह किंवा आमच्या कोणत्याही उपकंपन्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. बोगद्याच्या बांधकामात सहभागी असलेल्या कंपनीमध्ये आमचे कोणतेही शेअर्स नाहीत,” असे स्पष्टीकरण अदानी समूहाकडून देण्यात आले आहे.
सुब्रमण्यम स्वामींचे ट्विट आज सकाळी माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून बोगद्याच्या बांधकामाचा संबंध अदानी समूहाशी जोडला होता. त्यांनी ट्विट केले होते की, “उत्तराखंडमधील बोगदा कोणत्या खाजगी कंपनीने बांधला? त्या कंपनीचे भागधारक कोण आहेत? अदानी ग्रुप त्यापैकी एक आहे का? मी फक्त विचारत आहे,” असे ते म्हणाले होते.
41 कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्नउत्तराखंडमधील उत्तरकाशीतील बोगद्यात गेल्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी माती कोसळली आणि कामगार आतमध्ये अडकले. या सिल्क्यरा बोगद्यात 17 दिवसांपासून 41 कामगार अडकले आहेत. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र खोदकाम सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे बचावकार्यात वेळ लागतोय. NDRF, BRO, NHIDCL, ITBP सह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी आहेत.