नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणातल्या सांपला येथे छोटुराम यांच्या 64 फूट उंच प्रतिमेचं अनावरण केलं. पंतप्रधान मोदींनी या संधीचा फायदा घेत 2019च्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही मोदींनी हरियाणातून स्वतःच्या निवडणूक प्रचाराच्या अभियानाला सुरुवात केली होती. या आयोजित सभेत मोदींनी छोटुराम यांच्या आठवणींना उजाळा दिला. छोटुराम जिवंत असते तर पंजाबची आम्हाला चिंता करावी लागली नसती, असंही सरदार पटेल म्हणाले होते, याची आठवण मोदींनी यानिमित्तानं करून दिली. शेतक-यांना सावकारांपासून वाचवण्यासाठी आम्ही बँकांचे दरवाजे खुले केल्याचा उल्लेखही मोदींनी केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, आयुषमान भारतची पहिली लाभार्थी हरिणायाची मुलगी आहे. हरियाणा देशात वेगानं प्रगती करतोय. छोटुराम सारख्या महान व्यक्तीला एका दिशेपुरतं मर्यादित ठेवू नये. आमचं सरकार अशा व्यक्तींचं मान वाढवण्यासाठी काम करेल, शेतक-यांसाठी आम्ही एमएसपी वाढवले आहेत. धान्य, मका सारख्या पिकांचं एमएसपी दुप्पट करण्याचं आम्ही काम केलं. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी याची मागणी करत आहेत.
शेतक-यांना सावकारांपासून वाचवण्यासाठी आम्ही बँकांचे दरवाजे उघडले- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 6:15 PM