नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीतील लोकांशी संवाद साधला. महाभारताचं युद्ध १८ दिवस सुरू होतं. कोरोनाविरुद्धचं युद्ध २१ दिवस सुरू राहील आणि त्यात विजयी होण्याचा आपला प्रयत्न असेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाराणसीतील जनतेशी संवाद साधत संपूर्ण देशाला दिशा दाखवण्याचं आवाहन केलं. महाभारताचं युद्ध १८ दिवसांत जिंकलं गेलं. आता कोरोनाविरोधात संपूर्ण देश लढतोय. २१ दिवसांत हे युद्ध जिंकण्याचा आपला प्रयत्न आहे. महाभारतातल्या युद्धात भगवान श्रीकृष्ण सारथी होते. आज १३० कोटी महारथींच्या जोरावर आपण कोरोनाविरोधात लढत आहोत. यामध्ये काशीच्या रहिवाशांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. काशीचा अनुभव शाश्वत, सनातन असल्यानं काशी देशाला संयम, समन्वय आणि संवेदनशीलता शिकवू शकते. सहयोग, शांती, सहनशीलतेची शिकवण काशी देशाला देऊ शकते. साधना, सेवा, समाधानाचा धडा काशीवासी देशाला देऊ शकतात, असं मोदी म्हणाले. वाराणसीच्या लोकांशी संवाद साधताना मोदींनी काशीचं महत्त्व सांगितलं. काशीचा अर्थच शिव असा होतो. शिव म्हणजे कल्याण. शंकराच्या नगरीत, महादेवाच्या या नगरीमध्ये संकटाशी दोन हात करण्याचा मार्ग दाखवण्याचं सामर्थ्य आहे, अशा शब्दांत मोदींनी काशीचं महात्म्य अधोरेखित केलं. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता लोकांनी घरातच थांबावं, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. सरकारनं कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी आवश्यक तयारी केली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता लोकांनी घरातून बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्याचा हा सर्वात चांगला उपाय असल्याचं ते म्हणाले.