नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चा दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानं या विषयांच्या पुनर्परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकारावर मौन धारण केलेल्या CBSEनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या प्रमुख अनिता करवाल यांनी सार्वजनिक विधान केलं आहे.त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता पुनर्परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अद्याप परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. आम्ही विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करत आहोत. लवकरच परीक्षेच्या नव्या तारखांचीही घोषणा करू. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे दोन्ही पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी दिल्लीतल्या जंतर मंतरवर विरोध प्रदर्शनही केलं होतं. पोलीसही या पेपर फुटीप्रकरणी गांभीर्यानं तपास करतंय. पेपरफुटीमागे दिल्लीतल्या कोचिंग सेंटरचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी गुरुवारी अनेक कोचिंग सेंटर्सवर छापेमारी केली आहे.क्राइम ब्रँचनं एका कोचिंग सेंटरच्या मालकासोबतच 18 विद्यार्थ्यांसह 25 लोकांकडे चौकशी केली आहे. त्यानंतर सरकारनं या प्रकरणावर खुलासा केला आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, पेपरफुटीची घटना फारच दुखद आहे. त्या पेपरफुटीमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. मी स्वतः एका विद्यार्थ्याचा पालक आहे. या प्रकारामुळे मला रात्रीची झोपही लागत नाही. पेपरफुटी प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही. पोलीस लवकरच दोषींचा अटक करेल. या प्रकरणात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या अधिका-यांचीही चौकशी सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच पुनर्परीक्षेचा निर्णय घेतला, CBSE प्रमुखांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 9:56 PM