दोन आघाड्यांवर युद्धाची तयारी ठेवावी लागेल; लष्करप्रमुखांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 08:45 AM2023-04-27T08:45:40+5:302023-04-27T08:46:18+5:30
लष्करप्रमुख मनोज पांडे यांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘‘दोन आघाड्यांवर युद्ध टाळण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न केले जातील; परंतु, सुरक्षा दलांनी अशा परिस्थितीसाठी तयार राहणे आवश्यक आहे,” असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी व्यक्त केले. रशिया- युक्रेन संघर्षाच्या संदर्भात ते म्हणाले की, ‘‘अंमलबजावणीच्या स्तरावर आणि सामरिक पातळीवरही हा आमच्यासाठी मोठा धडा आहे.’’
मंगळवारी येथे एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या संवादात्मक सत्रादरम्यान ‘दोन आघाड्यांवर युद्धपरिस्थिती’बद्दल विचारले असता, जनरल पांडे म्हणाले, ‘‘दोन आघाडीवर युद्धाची परिस्थिती टाळण्यासाठी सर्व क्षेत्रात प्रयत्न केले जातील; परंतु, मला वाटते की आपल्याला सज्ज राहण्याची गरज आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास तुमच्याकडील संसाधनांचा कसा वापर कराल याची तयारी ठेवावी लागेल. आमच्याकडे प्राथमिक आघाडी आणि दुय्यम आघाडी कोणती आहे यावर अवलंबून योजना आहेत.”