कराची : औपचारिक समारंभाआधीच आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करणारे बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष जय शाह यांच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज आहे. त्यांनी एसीसीकडे नाराजी कळविली. त्यावर अनवधानाने असे घडल्याचे सांगण्यात आले. भारताची वेळ पाकच्या तुलनेत अर्धा तास आधी आहे. अशावेळी जय शाह यांची घोषणा आश्चर्यकारक होती. आशिया चषक ३० ऑगस्टपासून सुरू होत आहे.
वेळ साधली?आशिया कपचे वेळापत्रक हे बुधवारी सायंकाळी ट्रॉफीच्या अनावरणासह ७ वाजून १५ मिनिटांनी होणार आहे, असे पीसीबीकडून सांगण्यात आले होते. भारतीय वेळेनुसार हे वेळापत्रक सायंकाळी ७:४५ ला जाहीर होणार होते. मात्र, जय शाह यांनी लाहोरमधील अनावरणाच्या अधिकृत वेळेपूर्वीच वेळापत्रक जाहीर केले. जय शाह यांनी ट्विटवरून आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा केली. पीसीबीकडून वेळापत्रक जाहीर करण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला.
बांगलादेशचीही धुसफुस!विमान प्रवासात दगदग होईल, असे सांगून बांगलादेशने आशियाई क्रिकेट स्पर्धेच्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली. बांगलादेशचा पहिला साखळी सामना ३१ ऑगस्टला श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत होईल. त्यांना ३ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानबरोबर लाहोरमध्ये सामना खेळायचा आहे. संघ सुपर फोरमध्ये दाखल झाल्यास त्यांना पुन्हा श्रीलंकेकडे प्रस्थान करावे लागेल.