नवी दिल्ली:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इस्रायली सॉफ्टवेयर पेगासस(Pegasus)द्वारे केलेल्या गुप्तहेरीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे', अशा आशयाचे ट्विट करुन राहुल यांनी सरकारला टोला लगावला. रविवारी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये पेगासस सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार आणि नेत्यांसह इतरांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा केला आहे.
पॅरिसमधील संघटना फॉरबिडेन स्टोरीज (Forbidden Stories) आणि एमनेस्टी इंटरनॅशनल (Amnesty International ) सह अनेक संघटनांनी तपास केला आहे. यात इस्रायलची कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर पेगाससचा वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचा दावा करण्यात येतोय. तसेच, ही फोन हॅकिंग केंद्र सरकारच्या सांण्यावरुन केल्याचा आरोपही करण्यात आलाय. या मुद्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक विरोधी नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत राहुल गांधींनी ट्विट करत केंद्र सरकारला टोला लगावला. 'तुम्ही तुमच्या फोनमध्ये काय वाचतात, हे आम्हाला माहित आहे', असे ट्विट राहुल यांनी केले.
केंद्राचे स्पष्टीकरण रविवारी रात्री साडे नऊ वाजता ही रिपोर्ट समोर आली. यानंतर लगेच केंद्र सरकारने या रिपोर्टवर स्पष्टीकरण दिले. केंद्र सरकारने फोन हॅकिंग आणि यासंबंधी आरोपांचे खंडन केले आहे. तसेच, या रिपोर्टला भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. आपला बचाव करताना सरकारने म्हटले की, भारताच्या लोकशाङीत प्रायवसी एक अधिकार आहे. ही रिपोर्ट पूर्णपणे खोटी आहे.