अयोध्या : भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, त्यामुळे शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी दिली, याचा अर्थ आम्ही हिंदुत्वाशी फारकत घेतली असा होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी व पुत्र, तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह येथे श्रीरामाचे दर्शन घेतले. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेतर्फे १ कोटी रुपये देण्याची घोषणाही केली.
त्या आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्रात शिवसेनेने महाआघाडी सरकार स्थापन केले असले, तरी आतापर्यंतची हिंदुत्वाची भूमिका सोडलेली नाही, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, तसेच राज्य सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसून, आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा दावा केला.
उद्धव ठाकरे यांना अयोध्येत उत्तर प्रदेश पोलिसांनी मानवंदना दिली. त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक उपस्थित होते. त्यात मुंबई-ठाण्यातून गेलेल्या शिवसैनिकांचाही समावेश होता. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे जवळपास सर्व खासदार व राज्यातील मंत्रीही होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, कारण आमच्यात मतभेद नाहीत, असा दावाही त्यांनी केला.अयोध्येत राम मंदिर व्हावे, अशी शिवसेनेची सुरुवातीपासूनची मागणी होती. त्यासाठी केंद्राने कायदा करावा, असेही आम्ही म्हटले होते, पण केंद्राने कायदा केला नाही आणि नोव्हेंबरात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला, असे सांगून ठाकरे म्हणाले. तीन संत नजरकैदेतउद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्याचे काही संत-महन्तांनी जाहीर केले होते. त्यामुळे ते येण्याआधी महन्त परमहंस दास, महन्त राजू दास व हिंदू महासभेचे अध्यक्ष राकेश मिश्रा यांनी पोलिसांनी त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले होते.ट्रस्टवर हवे प्रतिनिधित्वउद्धव ठाकरे अयोध्येत असतानाच शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी राम मंदिरासाठीच्या ट्रस्टवर शिवसेनेचा प्रतिनिधी नेमण्यात यावा, अशी मागणी केली.नदीची आरती टाळलीउद्धव ठाकरे यांची संध्याकाळी अयोध्येतील शरयू नदीची आरती करण्याचीही इच्छा होती. त्यांच्या मूळ कार्यक्रमातही त्याचा समावेश होता, पण कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला सर्व नेत्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनीही तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. श्रीरामाच्या दर्शनानंतर ते लगेचच लखनौला आले आणि तेथून मुंबईकडे निघाले.भवनासाठी जमीन द्याउद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातून इथे येणाºया रामभक्तांसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येमध्ये जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी माझी त्यांना विनंती आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर योगी आदित्यनाथ वा उत्तर प्रदेश सरकार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, अयोध्या वा जवळच्या फैजाबादमध्ये त्यासाठी जमीन मिळू शकेल.