नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेले ऑपरेशन सतत यशस्वी होत आहे. कारण, येथील लोक दहशतवाद्यासंबंधीची माहिती लष्कराला देत आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले.
बुधवारी लष्कराच्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नवीद जटचाही समावेश आहे. यावर लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणाले की, 12 दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली होती. या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.
याबरोबर, आम्हाला दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना ठार करायचे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नवीद जट याला ठार केले. त्याचा 'रायझिंग काश्मीर' वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येत सहभाग होता.
पीओकेचा संदर्भात बोलताना लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणाले, पाकिस्तानने धूर्तपणे पीओके, गिलगिट-बाल्टिस्तानच्या लोकसांख्यिकीत बदल केला आहे. त्यामुळे काश्मिरी कोण आहे, हे सांगणे कठीण आहे. गिलगिट-बाल्टिस्तान येथील लोकही हळूहळू तिथे येऊन राहत आहेत.
याचबरोबर, जम्मू-काश्मीरमधल्या लोकांशी सरकार भेदभाव करते, हा चुकीचा आरोप आहे. तिथला युवक भरकटतोय कारण त्याच्याकडे करायला काहीच नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.