नवी दिल्ली: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या संशयास्पद मृत्यूवरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी मंगळवारी भाष्य केले. भारतीय नट्या आणि दाऊदच्या अनैतिक संबंधांकडे लक्ष दिले पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले की, श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल अधिकृत सूत्रांकडून माहिती येऊ द्या. कारण प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये एकवाक्यता आणि सातत्य नाही. श्रीदेवी यांनी आयुष्यात कधीच मद्यप्राशन केले नव्हते. मग त्यांच्या रक्तात मद्याचा अंश कसा आढळला? सीसीटीव्ही फुटेजचे काय झाले? श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर अचानकपणे प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यांनी परस्पर श्रीदेवी यांचा मृत्यू हदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे जाहीर केले. हे सर्वच संशयास्पद असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले.