आमचं तसं ठरलंय, पण...; खासदार संजय राऊतांनी सांगितला शिवसेनेचा स्वतंत्र मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:48 AM2021-08-03T09:48:44+5:302021-08-03T09:49:26+5:30

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची भेट

we stand with opposition but not a part of upa says shiv sena mp sanjay raut | आमचं तसं ठरलंय, पण...; खासदार संजय राऊतांनी सांगितला शिवसेनेचा स्वतंत्र मार्ग

आमचं तसं ठरलंय, पण...; खासदार संजय राऊतांनी सांगितला शिवसेनेचा स्वतंत्र मार्ग

googlenewsNext

नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले आहेत. मात्र पेगॅसस प्रकरण आणि तीन कृषी कायदे यावरून संसदेत मोठा गदारोळ सुरू आहे. त्यामुळे संसदेचं कामकाज व्यवस्थित पार पडत नाहीए. मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आज दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये सर्व विरोधी पक्षांना नाश्त्यासाठी बोलावलं आहे. त्याआधी काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेली शिवसेना दिल्लीत मात्र अधिकृतपणे या पक्षांसोबत नाही. काल राऊत यांनी राहुल यांची भेट घेतल्यानं त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना आता अधिकृतपणे काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) भाग झाली आहे का, असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही देशहिताच्या विषयांवर विरोधकांसोबत ठामपणे उभे आहोत. मात्र आम्ही यूपीएचे भाग नाही. आम्ही आमची स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवली आहे, असं राऊत म्हणाले.

राहुल गांधींसोबत झालेल्या चर्चेची माहिती राऊत यांनी पत्रकरांना दिली. 'राहुल गांधी दोन वर्षांत महाराष्ट्रात आलेले नाहीत. ते लवकरच राज्यात येणार आहेत. त्यांनी मला राज्यातील राजकारणाबद्दल काही प्रश्न विचारले. त्याबद्दल मी त्यांना माहिती दिली. बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीबद्दल त्यांना कुतूहल आहे. त्यांनी इतकी मोठी संघटना कशी उभी केली, ती कशी चालवली याबद्दलची माहिती राहुल यांनी जाणून घेतली,' असं राऊत यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी सरकार अंतर्गत लाथाळ्यांनी आणि ओझ्यानं पडेल, या विरोधकांच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. 'राहुल गांधी राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानी आहेत. सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांना आहे. त्यामुळे हे सरकार ओझ्यानं पडणार नाही. राज्य सरकार फुलपाखराप्रमाणे उडत चाललं आहे. सरकारच्या स्थिरतेबद्दल राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना खात्री आहे,' असं राऊत म्हणाले. राहुल गांधींसोबत अतिशय उत्तम चर्चा झाली. त्यांच्या मनात कोणाबद्दलही द्वेष, कटुता नाही, असं कौतुक राऊत यांनी केलं.

Web Title: we stand with opposition but not a part of upa says shiv sena mp sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.