नवी दिल्ली-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आलं होतं. अखेर शरद पवार यांनी आज त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मोदींसोबत झालेल्या भेटीची माहिती दिली. यात मोदींसमोर लक्षद्वीपमधील परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. तसंच महाराष्ट्रातील दोन मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं. यात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचं पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिलं आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर केंद्रीय यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कारवाईचाही मुद्दा मोदींसमोर उपस्थित केल्याचं पवारांनी सांगितलं.
मोदी आणि पवार यांच्या भेटीनंतर राज्यात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आमची शिवसेनेसोबत जितकी कटुता आहे तितकी कटुता राष्ट्रवादीसोबत नाही असं विधान केलं आहे, याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं असता आम्ही कधीच भाजपासोबत नव्हतो आणि भाजपाविरोधी पर्याय द्यायचा असं आमचं ठरलं आहे, असं उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले पवार?"महाविकास आघाडी सरकार भाजपाविरोधात उभी आहे. आम्ही कधीच भाजपासोबत नव्हतो. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. भाजपाविरोधात पर्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. सरकार ५ वर्ष पूर्ण करेल आणि पुढील विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच निवडून येईल", असं शरद पवार म्हणाले.
संजय राऊतांवर कारवाई कशाला?"संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. त्यांच्यावर कारवाई कोणत्या उद्देशानं करण्यात आली आहे? त्यांच्यावर कारवाईचं कारण काय? त्याचं राहतं घर जप्त करण्यात आलं आहे", असं पंतप्रधानांच्या कानावर घातल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसंच या कारवाया केंद्रीय यंत्रणांकडून होत असल्यानं मोदींच्या कानावर ही माहिती टाकल्याचं पवार म्हणाले. तसंच फक्त संजय राऊतांवरील कारवाईवरच पंतप्रधानांशी बोलणं झालं. नवाब मलिक आणि इतर नेत्यांवरील कारवाईबाबत कोणतीही माहिती मोदींना दिलेली नाही, हेही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.