आम्हाला तुमची वेदना समजते; शांतता परत आणू : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 06:37 AM2024-01-15T06:37:11+5:302024-01-15T06:37:29+5:30
काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात
थौबल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बहुचर्चित ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर येथून सुरुवात केली. वांशिक हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्याचे वचन त्यांनी या वेळी दिले. ‘आम्हाला तुमची वेदना समजते; सौहार्द, शांतता परत आणू,’ अशी फुंकर राहुल गांधी यांनी घातली.
मणिपूरची राजधानी इंफाळच्या दक्षिणेला असलेल्या थौबलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना गांधींनी, ‘कदाचित भाजप आणि आरएसएससाठी मणिपूर हा भारताचा भाग नव्हता,’ अशी टीका केली. ही यात्रा ६,७१३ किमी अंतर कापून १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा क्षेत्र आणि ११० जिल्ह्यांतून जाईल. यात्रेचा ६७ दिवसांनी २० मार्च रोजी मुंबईत समारोप होणार आहे.
कट्टरतावादी शक्तींशी आमचा लढा : खरगे
मल्लिकार्जुन खरगे यांनी यात्रेच्या बसचे अनावरण केले. ते म्हणाले, ‘काँग्रेस सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समानतेच्या बाजूने आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आणि कट्टरतावादी शक्तींशी लढा देण्यासाठी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढण्यात येत आहे. आमचे नेते शांततेच्या संदेशासाठी घरोघरी फिरत आहे, याचा मला अभिमान आहे.’
काँग्रेसने आपल्या नेत्यांना न्याय द्यावा : भाजप
मुंबई दक्षिणचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी पहाटे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला फटकारताना काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जयवीर शेरगील म्हणाले की, ‘काँग्रेसची ‘तोडो यात्रा’ सुरू झाली आहे.’ भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, ‘काँग्रेसने न्याय यात्रा काढण्यापेक्षा आधी आपल्या नेत्यांना न्याय द्यावा.’