नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपून मतदानाच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र देशभरात निवडणुकीत गाजलेल्या पश्चिम बंगालमधील निवडणुकीचं राजकारण आणखी तापू शकतं. कारण मतदानाच्या दिवशीही भाजपा आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद घडल्याचे प्रकार घडले आहेत. डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार निलंजन रॉय यांच्या गाडीवर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच मतदारांनाही मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप भाजपाने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये आज 9 जागांसाठी मतदान होत आहे. मात्र 6 लोकसभा जागांवर हिंसक घटना घडल्याने निवडणुकीचं वातावरण चिंतेत टाकणारे आहे.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालमधील मतदानावर भाष्य करताना तेथे घडत असलेल्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भाजपा उमेदवारांवर तसेच कार्यकर्त्यांवर राजरोसपणे टीएमसी कार्यकर्त्यांकडून हल्ले केले जात आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री इंच-इंच बदला घेण्याची भाषा करतात, त्यामुळे बंगालमधील मतदान संपल्यानंतर टीएमसीद्वारे नरसंहार होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. तसेच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत केंद्रीय सुरक्षा दल पश्चिम बंगालमध्ये तैनात ठेवावे अशी मागणीही निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
पराभव समोर दिसत असल्याने टीएमसी कार्यकर्ते घाबरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हिंसेचा वापर केला जात आहे. तसेच टीएमसीच्या हिंसाचाराविरोधात भाजपा पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यातील टोकाच्या दुश्मनीमुळे झालेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने वातावरण आणखी चिघळू नये यासाठी तेथील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार ठरल्या वेळेच्या एक दिवस आधीच बंद करण्याचा आदेश बुधवारी दिला होता. आजवरच्या कोणत्याही निवडणुकीत आयोगाला असे टोकाचे पाऊल उचलावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीवेळी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला होता. यावेळी दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली. अमित शहांचा ट्रक जात असताना त्यावर काठ्या भिरकावल्याने तणाव निर्माण झाला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे.