नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत कमकुवत देश नसून कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देऊ शकतो. देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन केली जाणार नाही असं ठणकावून सांगितलं आहे. दुंडिगल येथील एअर फोर्स अॅकॅडमीच्या दीक्षांत संचलनाच्या कार्यक्रमावेळी राजनाथ सिंह यांनी असं म्हटलं आहे. "भारत कमकुवत देश नसून कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देऊ शकतो, हे चीन सीमेवरील संघर्षाच्या परिस्थितीच्या हाताळणीतून भारताने दाखवून दिलं आहे. भारताला शांततेच्या मार्गाने तोडगा हवा आहे. मात्र देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन केली जाणार नाही" असं म्हटलं आहे.
कोविड 19 च्या संकटादरम्यान चीनचा पवित्रा त्यांचे हेतू दर्शवत होता, असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. "भारताला संघर्ष नको तर शांतता हवी आहे. चीनसोबतचे वाद मिटविण्यासाठी राजकीय आणि लष्कराच्या स्तरावर अनेकदा चर्चा झाल्या" असं म्हटलं आहे. तसेच दहशतवादाशी केवळ देशातच लढले जात नसून; सीमेपलीकडेही जाऊन संपवले जात आहे. बालाकोटमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकमुळे जगाला भारताचे सामर्थ्य, भारताचे हेतू आणि दहशतवादाविरुद्धची ठाम भूमिका दिसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकिस्तानवरही निशाणा साधला आहे. "भारताकडून चार वेळा युद्ध हरल्यानंतरही पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती सुरूच आहेत. दहशतवादाच्या रूपाने पाकिस्तानने 'प्रॉक्सी वॉर' सुरू केले आहे. सशस्त्र दले आणि पोलीस दहशतवादाशी प्रभावीपणे लढा देत आहेत" असं म्हटलं आहे. यासोबतच 'देशासमोर केवळ सीमाभागातीलच आव्हाने उभी नसून अवकाश आणि सायबर क्षेत्रातही ती आहेत. त्यासाठी देशाला सुसज्ज राहावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू", राहुल गांधींचं टीकास्त्र
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी जोरदार निशाणा साधला आहे. "मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू झाल्या आहेत" असं राहुल यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मी आजपर्यंत अनेकदा चीनकडून येणाऱ्या संभाव्य धोक्यांची कल्पना ही सरकारला दिली आहे. मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. चीनने जी नवी खेळी केली आहे ती भारतासाठी धोकादायक ठरू शकते" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यासोबतच त्यांनी एका बातमीचा देखील संदर्भ दिला आहे. ज्यामध्ये चीनने काराकोरमला कमी वेळात पोहचण्यासाठी एक नवा रस्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे. हा रस्ता भारताची डोकेदुखी ठरू शकतो असं म्हटलं आहे.