नवी दिल्ली - तेलंगणाचेमुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही म्हटलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेते नाहीत. भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकून द्यायला हवं. आम्ही शांत बसणार नाहीत, देशाचं नेतृत्व बदलायला हवं" असं म्हणत चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी टीकास्त्र सोडलं. त्यांच्या या टीकेला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "...तर आम्ही देखील चंद्रशेखर राव यांना कन्याकुमारीतील 3 समुद्रात बुडवू" असं म्हटलं आहे.
रामदास आठवले यांनी "तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपाला बंगालच्या उपसागरात फेकून देण्याचं विधान केलं होतं. त्यांनी असं विधान करणं योग्य नाही. जर ते भाजपाला बंगालच्या खाडीत फेकून देऊ असं म्हणत असतील तर आम्ही देखील त्यांना कन्याकुमारीमधील 3 समुद्रात बुडवू" असं म्हटलं आहे. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी भारताचे संविधान पुन्हा लिहिण्याची गरज आहे. आपल्या क्रांतीकारी विचारांना पुढे नेत युवकांनी आपल्या गरजांसाठी लढण्याची आवश्यकता आहे. देशात गुणात्मक बदल अपेक्षित आहे. त्यासाठी, सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं. यावेळी राव यांनी भाजपावर निशाणा साधला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेते नाहीत. भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकून द्यायला हवं. आम्ही शांत बसणार नाहीत, देशाचं नेतृत्व बदलायला हवं. देशाला असमजूतदार नेते आणि पक्षापासून मुक्त करायला हवं. आपण, लवकरच उद्धव ठाकरेंना भेटायला मुंबईला जाणार असल्याचेही" राव यांनी सांगितलं.
भाजपाकडून सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे. समाजात फूट पाडण्याचं आणि खोटा प्रचार, खोटा प्रसार करण्याचं कामही भाजपाकडून होत असल्याचे केसीआर यांनी म्हटलं आहे. राव यांनी मोदी सरकारच्या 2022 च्या अर्थसंकल्पावरही टीका केली. हे बजेट बेकार आणि उद्देशहीन असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, केसीआर यांनी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध घेतलेली भूमिका आणि उद्धव ठाकरेंना भेटण्याची व्यक्त केलेली इच्छा पाहता, भाजपाचे अच्छे दिन धोक्यात असल्याचं दिसून येत आहे.