लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल अनपेक्षित असून काँग्रेस त्यांचे विश्लेषण करत आहे असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. या निकालानंतर त्यांनी व्यक्त केलेली ही पहिलीवहिली प्रतिक्रिया आहे. तसेच हरयाणातील विविध मतदारसंघांतून आलेल्या तक्रारींबाबत निवडणूक आयोगाला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने माहिती दिली.
राहुल गांधी म्हणाले की, हरयाणात काँग्रेसचा झालेला पराभव धक्कादायक आहे. काँग्रेसला केलेल्या मतदानाबाबत हरयाणा व जम्मू-काश्मीरमधील जनतेचे आम्ही आभारी आहोत. जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला मिळालेला विजय हा राज्यघटनेच्या मूल्यांचा विजय आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला विजय मिळाला होता. राहुल गांधी यांनी सांगितले की, हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या अनपेक्षित निकालांचे काँग्रेस विश्लेषण करत आहे. या राज्यातील निवडणुकांत कठोर परिश्रम केलेल्या काँग्रेसच्या सर्व खंद्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो.
‘ईव्हीएम’मधील त्रुटींची चौकशी करा : काँग्रेस
हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीदरम्यान काँग्रेसने बुधवारी हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान काही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्समध्ये (ईव्हीएम) आढळलेल्या त्रुटींची सखोल चौकशी करण्याची काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही ईव्हीएम सील करून एका ठिकाणी सुरक्षित ठेवली जावीत, असेही काँग्रेसने म्हटले आहे.काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची बुधवारी भेट घेऊन हरयाणातील विधानसभा निवडणुकांच्या काही मुद्द्यांवर चर्चा केली.
तिन्ही अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा
चंदीगड: हरयाणा निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भाजपने सरकार स्थापण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यात भाजप सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पाठिंबा देण्याचा निर्णय सावित्री जिंदाल, देवेंद्र कादयान आणि राजेश जून या तीन अपक्ष आमदारांनी घेतला आहे.