काँग्रेस Narendra Modi Stadium चं नाव बदलणार! जाहीरनाम्यात दिली मोठी आश्वासनं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 03:19 PM2022-11-12T15:19:12+5:302022-11-12T15:22:54+5:30
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सर्वसामान्यांसाठी महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.
गुजरात विधानसभा निवडणूक 2022 चा (Gujarat Assembly Election 2022) बुगूल वाजला आहे. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी कामाला लागले आहेत. यातच, काँग्रेसनेही गुजराती जनतेला आकर्षित करण्यासाठी आपला निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सर्वसामान्यांसाठी महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा सुरू आहे, ती नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलण्याची. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात आपले सरकार आल्यास आपण नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलू आणि त्याला सरदार पटेलांचे नाव देऊ, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
काँग्रेसने दिली ही मोठी आश्वासने -
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या आपल्या जाहीरनाम्यात काँग्रेसने, सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी पद्धत संपुष्टात येईल, 10 लाख सरकारी नोकऱ्या देण्यात येतील, बेरोजगारांना 3000 रुपये एवढा बेरोजगारी भत्ता देण्यात येईल. गॅस सिलिंडर ५०० रुपयांना मिळेल. 300 युनिट वीज मोफत दिली जाईल. तसेच, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली जाईल. प्रत्येक गुजराती व्यक्तीला 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिला जाईल, शेतकऱ्यांचे तीन लाखांचे कर्ज माफ केले जाईल. याच बरोबर, त्यांचे वीज बिलही माफ केले जाईल, अशी आश्वासने दिली आहेत.
शेतकऱ्यांसाठी काँग्रेसची आश्वासने -
काँग्रेसने गुजरातमधील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी, पिकांना भाव देण्यासाठी 'भाव निर्धारण समिती' स्थापन करण्यात येईल, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, गरजू विद्यार्थ्यांना 500 ते 20,000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाईल, अशी आश्वासने दिली आहेत.
दूध उत्पादकांना मिळेल सब्सिडी -
गुजरात काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात, दूध उत्पादकांना 5 रुपये प्रति लिटर सब्सिडी मिळेल, असे आश्वासन दिले आहे. याच बरोबर, 4 लाख रुपयांची कोविड नुकसान भरपाई दिली जाईल. गेल्या 27 वर्षांत जो भ्रष्टाचार झाला, त्याची चौकशी होईल. अँटी करप्शन अॅक्ट आणून दोषींना कारागृहात पाठवले जाईल. मनरेगा योजनेसारखी शहरी रोजगार गॅरंटी योजना चलविली जाईल.