नवी दिल्ली : टॉवर आॅफ लंडनमध्ये प्रदर्शनास ठेवण्यात आलेल्या शाही मुकुटातील ‘कोहिनूर’ हिरा परत देण्यास ब्रिटनने कायदेशीर आधाराचा हवाला देत नकार दिला असला तरी भारत सरकार १०६ कॅरेटचा कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.२०० दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक मूल्य असलेला ‘कोहिनूर हिरा’ ब्रिटिश फौजांनी पंजाबवर कब्जा करून शीख साम्राज्याची संपत्ती जप्त केल्यानंतर लाहोरमधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या खजिन्यात हस्तांतरित केला होता. एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, भारत सरकार कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी राजनैतिक, तसेच कायदेशीर मार्गाचा विचार करीत आहे. राजनैतिक प्रयत्न सफल झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याची गरज पडणार नाही. मागच्या आठवड्यात ब्रिटनचे आशिया प्रशांत विभागाचे मंत्री आलोक शर्मा यांनी केलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे. भारताला कोहिनूर पुन्हा कधीच मिळणार नाही, असे संकेत शर्मा यांनी दिले होते. कोहिनूर परत करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नाही, असेही शर्मा म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर भारताने कोहिनूर परत मिळविण्याचा निर्धार केला. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने या हिऱ्यावर दावा करीत मैदानात उडी घेतली. पंजाबचा कोहिनूरवर वैधानिक हक्क आहे. ब्रिटिशांनी कपट करून पंजाबचे शेवटचे शासक महाराजा दलीप सिंह यांच्याकडून कोहिनूर नेला होता, असे पंजाबचे मंत्री दलजित सिंग चीमा यांनी म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कोहिनूर हा भावनात्मक मुद्दा राहिला आहे. तो परत आणण्यास सरकारवर राजकीय दबाव वाढल्यानंतर सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी अलीकडेच विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चाही केली होती. प्राप्त माहितीनुसार कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी पुढच्या महिन्यात ब्रिटनशी संपर्क करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. >सर्वोच्च न्यायालयात कोहिनूर हिरा परत आणण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी चालू आहे. त्यानंतर कोहिनूरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. भारतासह चार देशांनी या हिऱ्यावर दावा केला असून, हा ऐतिहासिक मालकीचा वादग्रस्त विषय आहे.
कोहिनूर परत आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार
By admin | Published: August 01, 2016 1:42 AM