लोकसभा निवडणुकीतील पराभव, राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा, काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा केलेला निष्फळ प्रयत्न, राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा, या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली. यावेळी, संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांचीच पुन्हा एकमताने निवड करण्यात आलीय. त्यानंतर, राहुल गांधी यांनी भाजपाशी लढण्याचा निर्धार व्यक्त करून खासदारांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला.
'लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ५२ खासदारच निवडून आले असले, तरी लोकसभेत भाजपाला घेरण्यासाठी, त्यांचा सामना करण्यासाठी आपण पुरेसे आहोत, हे विसरू नका. संविधानाच्या रक्षणासाठी कुठलाही भेदभाव न करता आपल्याला लढायचं आहे. प्रत्येक देशवासीयाच्या हितासाठी उभं राहायचं आहे', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी खासदारांना ताकद दिली.
वास्तविक, काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत पक्षाचा लोकसभेतील गटनेता निवडला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यासंबंधीचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना देण्यात आले आहेत. राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचं काय, याबद्दलचा सस्पेन्सही अद्याप कायम आहे. मल्लिकार्जुन खर्गे किंवा पक्षाचे अन्य काही वरिष्ठ नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानं राहुल यांच्याकडे गटनेतेपद दिलं जाऊ शकतं, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर, राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात मतदारांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले होते. भाजपाचं विजयाबद्दल अभिनंदन केलं होतं. पण, त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे. अनेक नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु राहुल आपल्या निर्णयावर ठाम आहेत. अनेक नेत्यांना तर त्यांनी भेटणंही टाळलंय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसं झाल्यास शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष होतील आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी घेतील, असा अंदाज बांधला जातोय. असं असतानाच, राहुल यांनी खासदारांना सोबत घेऊन लढण्याचा निर्धार व्यक्त करणं सूचक मानलं जातंय.