लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. हे दोघेही बुधवारी (21 ऑगस्ट) सायंकाळी श्रीनगरला पोहोचले. राहुल आणि खर्गे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यासाठी जम्मू आणि श्रीनगरमध्ये आहेत. यावेळी, आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची लढाई लढू, असे काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.
एकत्रितपणे निवडणूक लढण्याची इच्छा -काँग्रेसाअध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, 'आम्ही येथे कार्यकर्त्यांना निवडणुकीची माहिती देण्यासाठी आलो आहोत. सर्व विरोधकांना सोबत घेऊन पुठे चालण्याची राहुल गांधी यांची इच्छा आहे. INDIA चा परिणाम आपण बघितला आहेत. आपण हुकूमशहाला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले आहे. त्यांना तीन कायदे मागे घेण्यासही भाग पाडले आहे.
आम्ही जम्मू-कश्मीरच्या लोकांसोबत -खर्गे पुढे म्हणाले, "ऐतिहासिकदृष्ट्या सर्व केंद्रशासित प्रदेशांचे राज्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, मात्र जम्मू-काश्मीरबाबत असे घडलेले नाही. इथे ना विधानसभा, ना परिषद, ना पंचायत ना नगरपालिका. आता सर्वोच्च न्यायालयाच्या दबावामुळे निवडणुका जाहीर झाल्या आहेत."
एवढेच नाही तर, "भाजप आणि पंतप्रधान मोदी लोकशाही कधीही नष्ट करू शकणार नाहीत आणि जनतेचा आवाजही दाबू शकणार नाहीत. आम्ही जम्मू-काश्मीरच्या जनतेसोबत आहोत. आमचे सरकार आल्यास येथील तरुणांना रोजगार देऊ आणि येथील उद्योग वाचवू. कलम 370 हटवूनही येथे दहशतवाद वाढला आहे," अशेही मल्लिकार्जून खर्गे यावेळी बोलताना म्हणाले.