अभिलाष खांडेकर -
भोपाळ : भारतातील जगप्रसिद्ध कान्हा व्याघ्र प्रकल्पातील नक्षलवाद्यांची समस्या कठोरपणे हाताळली जाईल, असे संकेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत. मध्यप्रदेश वन्यजीव मंडळाच्या २२व्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात त्यांनी अनेक ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकांची माहिती सरकारला मिळालेली आहे व अनेक ठिकाणी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. व्याघ्र अभयारण्याच्या ८० टक्के जागेवर नक्षलींनी कब्जा केला आहे, याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. त्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती.
तथापि, मुख्यमंत्र्यांनी प्रथमच अधिकृतरित्या याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ही समस्या फक्त कान्हातूनच नव्हे तर संपूर्ण मध्यप्रदेशातून हद्दपार करायची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मागील वर्षी बालाघाट आणि परिसरातून काही नक्षल नेत्यांवर कारवाई केलेली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. मुख्य वन्यजीव रक्षक जे. एस. चौहान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कान्हामधील नक्षलवाद्यांच्या मुद्द्यावर सरकार वन विभागाशी समन्वय साधून सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे.
वाढते संघर्ष : मानव आणि जंगली हत्तींचे वाढते संघर्ष यावरही वन्यजीव मंडळाने चर्चा केली. आ. नरेंद्र सिंग यांनी हा मुद्दा उपस्थित करून म्हटले आहे की, सिधी, अनुप्पूर, उमारिया आदी भागांमध्ये ही समस्या गंभीर बनली आहे. हत्तींचे कळप गावांमध्ये शिरून मालमत्ता व शेतीची नासधूस करत आहेत.