Ganderbal Terrorist Attack: जम्मू काश्मीरमध्ये नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं आहे. दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा परप्रांतिय नागरिकांच्या हत्या करण्यात येत आहेत. रविवारी श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील झोजिलाच्या पायथ्याशी असलेल्या गगनगीर सोनमर्ग येथील जैदमोध बोगदा प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात कामगारांचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. पोलीस आणि लष्कराने कामगार छावणी आणि लगतच्या परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिला आहे.
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांसह ७ जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात पाच कामगार जखमी असून सर्व जखमींना उपचारासाठी सौरा येथील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे या भ्याड हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राहुल गांधी, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तसेच जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हल्ल्याचा निषेध करण्यासोबतच गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवाद्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला आहे.
'जम्मू-काश्मीरमधील गांदरबलमधील नागरिकांवर झालेला हा भ्याड दहशतवादी हल्ला भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना आमच्या सुरक्षा दलांच्या कठोर प्रत्युत्तराचा सामना करावा लागेल. या दु:खाच्या प्रसंगी, मी मृतांच्या कुटुंबीयांसाठी संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो," असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
"जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टर आणि स्थलांतरित मजुरांसह अनेकांची हत्या हा अत्यंत भ्याड आणि अक्षम्य गुन्हा आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्याची आशा व्यक्त करतो. दहशतवाद्यांचा हा धाडसीपणा जम्मू-काश्मीरमधील बांधकाम आणि लोकांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात संपूर्ण देश एकत्र आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.