श्रीनगर - सतत वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण केला आहे. काश्मीरमधील योद्धे (दहशतवादी) आपल्या हक्कासाठी बलिदान देत आहेत. ही आमची भूमी असून आम्ही याचे मालक आहोत. आमदार, खासदार किंवा मंत्री बनण्यासाठी आमची मुले बलिदान देत नाहीयत असे विधान अब्दुल्ला यांनी शुक्रवारी श्रीनगरमध्ये केले. आम्हाला आमची भूमी परत द्या. विसरु नका हे योद्धे (दहशतवादी) स्वातंत्र्यासाठी सर्व काही सोडून आले आहेत.
कोणालाही मरण्याची इच्छा नसते. पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ शकतो. पण हे कधी भारताला आणि पाकिस्तानलाही समजणार नाही. 1931 पासून ही लढाई सुरु झाली आहे. आम्ही कोणाचेही शत्रू नाही. पण तुम्ही आमच्याबरोबर न्याय करा हेच आम्ही या दोन देशांना सांगत आहोत असे अब्दुल्ला म्हणाले.
1948 साली तुम्ही जो शब्द दिला होता तो विसरलात. आता तुम्ही नव्या पिढीचा सामना करत आहात जे बंदुकीला घाबरत नाहीत. ज्यांना काश्मीरला स्वतंत्र करायचे आहे असे अब्दुल्ला म्हणाले.
फक्त पाकिस्तान कुठे गोळीबार करतो, आपणही करतोच की!यापूर्वीही अब्दुल्ला यांनीही अशीच वादग्रस्त विधाने केली आहेत. सीमारेषेवर एकट्या पाकिस्तानकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन होते असे नाही. भारताच्या बाजूनेही अनेकदा गोळीबार केला जातो, असे वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. नोव्हेंबरमध्ये फारुख अब्दुल्लांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा पाकिस्तानचा भाग असून पीओकेला पाकपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे विधान केले होते.
पाकिस्तान कधीच षडयंत्र रचत नाही गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानमध्ये कट रचण्यात आल्याचा दावा फारुख अब्दुल्ला यांनी फेटाळून लावला आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानची बाजू घेत पाकिस्तान कधीच षडयंत्र रचत नसल्याचा अजब दावा केला. उलट नरेंद्र मोदीच पाकिस्तानात गेले होते अशी टीका केली.