रांची- राजदचे सर्वेसर्वा व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळाप्रकरणी रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाचे साडे तीन वर्षाचा कारावास व पाच लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिक्षा सुनावण्यात आली. 21 वर्षांनंतर चारा घोटाळ्याचा निकाल लागला. लालू प्रसाद यांना जामीन मिळणार नाही, असंही कोर्टाने सांगितलं. लालू प्रसाद यादव यांच्या जामीनासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं लालूप्रसाद यादव यांचा मुलगा व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हंटलं आहे. मी हार मानणार नाही. लालू प्रसाद यादव यांच्या हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आणि जामीन मिळवणारच, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
लालू प्रसाद यादव यांना कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर राजदच्या भविष्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजदचं भविष्यात काय होणार? यावरूनही अनेक चर्चा होत आहेत. तर दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांच्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणात फूट पडेल, अशीही शक्यता वर्तविली जाते आहे. पण, तेजस्वी यादव यांनी हे सर्व अंदाज चुकीचे ठरतील, असं म्हटलं आहे.
शनिवारी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावण्याच्या काही वेळ आधी तेजस्वी यादव यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. लालूप्रसाद यादव भाजपासोबत नाहीत म्हणून त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मी काही जुन्या जाणत्या राजकारण्यांसारखा लालची नाही, असं म्हणत तेजस्वी यादव यांनी नाव न घेता नितीशकुमारांवर टीका केली. लालू प्रसाद यादव यांना शिक्षा झाल्याने सगळं संपेल, असा काही जणांना गैरसमज आहे. पण आमच्या पक्षातल्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी माझी जबाबदारी समर्थपणे पार पाडेन, असंही तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केलं.