श्रीनगर : राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरपुढे शांतता व विकास असे दोनच मार्ग आहेत. जो कोणी यात खोटा घालण्याचा प्रयत्न करील त्याला तुरुंगात डांबले जाईल, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पार्टीचे काश्मीरविषयीचे प्रभारी सरचिटणीस राम माधव यांनी रविवारी येथे दिला.
काश्मीरमध्ये भाजपतर्फे येथील चागोर हॉलमध्ये युवा मोर्चाच्या सम्मेलनाच्या रूपाने पहिलाच राजकीय कार्यक्रम झाला. त्यात बोलताना राम माधव म्हणाले की, आत्तापर्यंत काश्मीरमध्ये जे काही केले जात होते ते फक्त काही निवडक नेते किंवा निवडक कुटुंबांसाठी केले जात होते. पण आता काश्मीर सामान्य काश्मिरी नागरिकांच्या भल्यासाठी कामाला लागले आहे. लोक हाती शस्त्रे घेतील व प्राण द्यायलाही तयार होतील, असे संदेश काही नेते तुरुंगातून समाजमाध्यमांत टाकत आहेत. मी त्या नेत्यांना सागेन की, इतरांना चिथावण्यापेक्षा स्वत: पुढे या व काय त्याग करायचा तो करा.
भारतात खूप तुरुंग आहेत...
राम माधव पुढे म्हणाले की, यापुढे काश्मीरपुढे शांतता व विकास हे दोनच मार्ग असतील. जे कोणी याच्या आड येतील त्यांची जराही गय केली जाणार नाही. अशा लोकांना ठेवण्यासाठी भारतात खूप तुरुंग आहेत.