भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) सामील होण्याबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी बुधवारी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कमलनाथ यांनी सांगितलं की, मी त्यांच्यावर "स्वतःला लादणार नाही" आणि त्यांना हवं असल्यास ते "पक्ष सोडतील". छिंदवाडा येथील हर्रई येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना त्यांनी अनेक वर्षांपासून त्यांना कार्यकर्त्यांचं प्रेम आणि विश्वास मिळत असल्याचं सांगितलं.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री म्हणाले की, “जर तुम्हाला कमलनाथ यांना निरोप द्यायचा असेल तर ती तुमची मर्जी आहे. मी जायला तयार आहे. मी स्वतःला तुमच्यावर लादू इच्छित नाही. हा तुमच्या मर्जीचा विषय आहे.'' कमलनाथ यांचा मुलगा छिंदवाडा मतदारसंघातून खासदार आहे. त्यांचा मुलगा पुन्हा या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याचं कमलनाथ यांनी आधीच जाहीर केलं होतं.
छिंदवाडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेस नेत्याने सांगितलं की, भाजपा स्वत:ला आक्रमकपणे सादर करत आहे, परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी घाबरू नये. "भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपल्याला मतदान करावं लागेल आणि माझा तुमच्या सर्वांवर विश्वास आहे" असं म्हटलं आहे.
कमलनाथ म्हणाले की, "अयोध्येतील रामाचे मंदिर सर्वांचे आहे आणि भाजपने त्याच्या उभारणीचे श्रेय घेऊ नये. राम मंदिर भाजपचे आहे का? ते माझ्यासह सर्वांचे आहे. हे मंदिर जनतेच्या पैशातून बांधण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि ते (भाजप) सत्तेत असल्याने त्यांनी मंदिर बांधले. आम्ही प्रभू रामाची पूजा करतो आणि छिंदवाडा येथील भूमीवर हनुमानाचं मोठं मंदिर बांधलं आहे."