‘मनरेगा’ची मजुरी ४०० रुपये करू, महिला बनतील लखपती : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 07:32 AM2024-05-07T07:32:22+5:302024-05-07T07:32:42+5:30
मध्य प्रदेशातील खरगोन लोकसभा मतदारसंघांतील सेगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते.
खरगोन (मध्य प्रदेश) : निवडणुकीनंतर केंद्रात आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल; तसेच ‘मनरेगा’अंतर्गत दिली जाणारी मजुरी २५० रुपयांवरून ४०० रुपये केली जाईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातील खरगोन लोकसभा मतदारसंघांतील सेगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते. काँग्रेसने खरगोन (अनुसूचित जमाती) आणि खांडवा लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे पोरलाल खरते आणि नरेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ‘राज्यघटना, आरक्षण, सार्वजनिक क्षेत्रांतील उद्योग व आदिवासींच्या जल, जंगलांवरील हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस ही निवडणूक लढवत आहे. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास गरीब महिलांना करोडपती बनविण्यासाठी त्यांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा करणार आहे’, असे ते म्हणाले.
आरक्षणाची मर्यादा वाढवणार
भाजप सत्तेत आल्यास आदिवासी, दलित व इतर मागासवर्गीयांचे आरक्षण हिरावून घेईल. त्यांचे नेते तसे स्पष्टपणे सांगत आहेत. आम्ही कोणाचेही आरक्षण न काढता उलट ते वाढवणार आहोत. न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के केली आहे. ही मर्यादा आम्ही हटवू, असे राहुल म्हणाले. मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी जातिनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणाचे समर्थन केले. यातून लोकांची वास्तविक स्थिती समोर येईल आणि देशातील राजकारणाची दिशा बदलेल, असेही ते म्हणाले.
‘१५० जागाही त्यांना मिळणार नाही’
भाजपने राज्यघटना बदलण्याच्या उद्देशाने ४०० पारची घोषणा दिली आहे. ४०० सोडा त्यांना यावेळी १५० हून अधिक जागा मिळणार नाही, असेही ते म्हणाले. विरोधी आघाडी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी कृषी उत्पादनाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सुनिश्चित करण्यासाठी कायदा करेल, असे ते म्हणाले.