नवी दिल्ली - विद्यार्थी असल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत भाजपाशी अतूट नातं जोडलेले देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं आज निधन झालं. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. जेटली यांच्या निधनानं एक मोठा नेता आणि भला माणूस गमावल्याची भावना देशभरातून व्यक्त होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जेटलींच्या निधनाबद्दल अत्यंत भावुक प्रतिक्रिया दिली आहे. मी माझा सगळ्यात जवळचा मित्र गमावला, अशा शब्दांत मोदींनी जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर आहेत. फ्रान्सचा दौरा आटोपून ते अबुधाबीला पोहोचलेत. तिथे त्यांना अरुण जेटलींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांनी एकापोठापाठ एक पाच ट्विट केली आहेत. मोदींच्या आयुष्यात जेटलींचं स्थान किती मोलाचं होतं, हे त्यातून सहज लक्षात येतं. ''भाजपा आणि अरुण जेटली यांचं अतूट नातं होतं. एक विद्यार्थी संघटनेतील नेता म्हणूनही त्यांचं कार्य लक्षणीय ठरलंय. आणीबाणीच्या काळातही सरकारचा विरोध करण्यासाठी ते सर्वात पुढे होते. पक्षाची विचारधारा, ध्येय आणि धोरण समाजापुढे प्रभावीपणे मांडण्यात ते अग्रेसर असत. पक्षाच सर्वात आवडता चेहरा म्हणून जेटलींकडे पाहिलं जातं, अशी भावनिक प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी दिली आहे.
आपल्या राजकीय आणि ससंदीय कारकिर्दीत अरुण जेटलींनी अनेक मंत्रालयाचा पदभार सांभाळला. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं कामही जेटलींनी केलं. अतिशय प्रभावी वक्ता, उत्तम विनोदबुद्धी, कायदेपंडित, राज्यघटनेचं सखोल ज्ञान असलेलं नेतृत्व म्हणजे जेटली, अशी त्यांची ओळख होती. संपूर्ण एक दशक त्यांच्यासमेवत जवळून काम करण्याचं भाग्य मला लाभलं, असे म्हणत मोदींनी जेटलींना श्रद्धांजली वाहिली. तसेच, जेटलींच्या पत्नी संगिता आणि मुलगा रोहन यांच्याशी फोनवरुन संवादही साधला. दरम्यान, मोदी अबुधाबीच्या दौऱ्यावर असून नियमित दौरा पूर्ण केल्यानंतरच भारतात परतणार आहेत.