नवी दिल्ली - लोकशाहीचं पवित्र मंदिर असलेल्या नवी दिल्लीतीलसंसद भवनावर 13 डिसेंबर 2001 रोजी 'न भूतो न भविष्यति' अशी घटना घडली. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. देशाच्या लोकतंत्राचे मंदिर समजल्या जाणाऱ्या संसदेत झालेला हा हल्ला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जवानांचा मृत्यू हा संपूर्ण देशासाठी धक्कादायक बाब होती, भारतीय संविधानाला धक्का पोहोचविणारा हा हल्ला होता. या हल्ल्यात दिल्ली पोलीसचे 5 जवान, संसदेचे 2 सुरक्षा रक्षक शहीद झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
संसद भवनावरील हल्ल्याच्या घटनेला आज 19 वर्षे पूर्ण होत असले तरीही त्याच्या आठवणी, ती भीती अजूनही लोकांच्या मनात घर करुन आहे. लोकसभेचं हिवाळी सत्र सुरू असतानाच लष्कार ए तोएबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मुहम्मदच्या 5 आतंकवाद्यांनी 13 डिसेंबर 2001 रोजी सकाळी 11.40 वाजता अॅम्बेसेडर मधून संसद परिसरात प्रवेश केला. त्यांच्या येण्यापूर्वीच 40 मिनिटांअगोदर लोकसभा आणि राज्यसभा स्थगित झाली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 100 नेते त्यावेळी संसदेत उपस्थित होते.
लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचविण्यासाठी, या मंदिरातील नेतेमंडळींना वाचविण्यासाठी सैन्य दलाच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यामध्ये, दिल्ली पोलिसांच्या 5 तर संसद भवनाच्या 2 सुरक्षा रक्षकांना वीरमरण आलं. दिल्ली पोलिसचे जवान नानक चंद, रामपाल, ओमप्रकाश, बिजेंद्र सिंह आणि घनश्याम तथा केंद्रीय रिजर्व पोलीस बलाची महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी आणि संसद सुरक्षेचे 2 सुरक्षा सहायक जगदीश प्रसाद यादव आणि मातबर सिंह नेगी यांनी या हल्ल्यात प्राणांची आहुती दिली सोशल मीडियातून आज भारतमातेच्या या वीरपुत्रांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या ट्विटरवरुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, संसद भवनावरील तो भ्याड हल्ला आम्ही कधीही विसरू शकत नाही, या हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करतो, देश कायमस्वरुपी त्यांच्या आभारी असेन, असे ट्विट मोदींनी केलंय.
दरम्यान, या संपूर्ण अतिरेकी कारवाईचा मास्टर माईंड अफजल गुरु या अतिरेक्याला 15 डिसेंबर 2001 मध्ये जम्मू-काश्मीर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन त्यास फाशी देण्यात आली. अफजल गुरुला फाशी शिक्षा देण्यासाठी देशाला 12 वर्षे वाट पाहावी लागली. 9 फेब्रुवारी 2013 ला तिहार जेलमध्ये त्याला फाशी देण्यात आली.