कोलकाता: तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारा कायदा देशभरात लागू झाला आहे. मात्र हा कायदा आपल्याला अमान्य असल्याचं ममता बॅनर्जींच्या मंत्र्यानं म्हटलं आहे. तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्याबद्दल मला दु:ख वाटतं. हा इस्लामवरील हल्ला आहे. त्यामुळे आम्ही तिहेरी तलाकवरील कायदा स्वीकारणार नाही, असं ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी म्हटलं. यावरुन मोठा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालचे मंत्री असलेले सिद्दीकुल्लाह चौधरी जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष आहेत. तिहेरी तलाक कायद्याला स्पष्ट विरोध असल्याचं चौधरी म्हणाले. यावर केंद्रीय समितीची बैठक झाल्यास आम्ही पुढील कारवाईचा विचार करू, अशा शब्दांमध्ये त्यांनी पुढील भूमिका स्पष्ट केली. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरुन भाजपानं तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता चौधरी यांच्या विधानामुळे भाजपा अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आम्ही तिहेरी तलाक कायदा मानत नाही; ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 7:31 PM