नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढील आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. त्या दौऱ्यादरम्यान त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. टीएमसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत त्या राज्याची थकबाकी आणि बीएसएफचे वाढलेले अधिकारक्षेत्र या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगाल विधानसभेत बीएसएफच्या अधिकारक्षेत्रात झालेल्या वाढीविरोधात ठराव मांडण्यात आला आहे.
टीएमसीचे प्रवक्ते म्हणाले, 2024मध्ये लोकसभा निवडणुका आहेत आणि राज्याच्या 50 किमी परिघात लोकसभेच्या 22 जागा येतात. भाजप बीएसएफच्या माध्यमातून या 22 जागांवर लक्ष ठेवून आहे, म्हणूनच त्यांना 15 किमीची मर्यादा वाढवून 50 किमी पर्यंत वाढवायची आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी बीएसएफ जवान सक्षम आहेत का? सिलीगुडीपासून सुंदरबनपर्यंतच्या सीमावर्ती भागात हत्या झाल्या, तेव्हा बीएसएप आले नाही. जोपर्यंत आमच्या शरीरात रक्त शिल्लक आहे, तोपर्यंत आम्ही बीएसएफला आमच्या भूमीत येऊ देणार नाही, असे टीएमसीने स्पष्टपणे सांगितले आहे.
ममतांचा दिल्ली दौरा
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढील आठवड्यात नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. या बैठकीत राज्याची थकबाकी आणि बीएसएफचे वाढलेले कार्यक्षेत्र यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. ममता 22 नोव्हेंबरला राष्ट्रीय राजधानीला भेट देतील आणि 25 नोव्हेंबरला कोलकात्याला परततील. टीएमसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- त्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधानांसह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्याही भेटीही घेऊ शकतात.