कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिगेड परेड मैदानावर आज तृणमूल काँग्रेस (TMC)ची भव्य रॅली झाली. या रॅलीने तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी 'जन गर्जन सभा' या विशाल रॅलीत लोकांना संबोधित केले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही देशात एनआरसी लागू होऊ देणार नाही, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेस उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करत असल्याची माहिती देखील ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिली.
ममत बॅनर्जी यांनी आज राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी क्रिकेटपटू युसूफ पठाणला बेरहामपूर मतदारसंघातून तिकीट दिले, असून त्यांचा सामना काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. महुआ मोईत्रा कृष्णनगरमधून निवडणूक लढवतील. विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा आसनसोलमधून निवडणूक लढवणार आहेत.
याशिवाय माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद हे बर्दवान दुर्गापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या निवडणुकीत ही जागा भाजपच्या अहलुवालिया यांनी जिंकली होती. विद्यमान खासदार नुसरत जहाँचे तिकीट कापले असून, हाजी नुरुल इस्लाम बशीतरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, जगदीश चंद्र बर्मा बसुनिया कूचबिहारमधून निवडणूक लढवतील. पक्षाच्या युवक काँग्रेस अध्यक्षा सयानी घोष जाधवपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.