भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी अखेर आपला पराभव मान्य केला आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्याचा दावा करणार नाही,अशी माहिती शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. शिवाय, पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. तब्बल 15 वर्षांनंतर चौहान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
राजीनामा दिल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी, आता मी मुक्त आहे, अशी प्रतिक्रियाही दिली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मी राजीनामा दिला आहे. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी केवळ माझी आणि माझीच आहे. पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली होती.
शिवराज सिंह चौहान यांनी असेही सांगितले की, भाजपाची मतं वाढली पण जागांची संख्या घटली. 'ना हार में, ना जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, कर्तव्य पथ पर जो भी मिले, ये भी सही वह भी सही।', पत्रकारांसोबत बोलताना चौहान यांनी ही कविताही बोलून दाखवली.
मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. भाजपा किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. परंतु मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करू शकणार आहे.
दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दुपारी 12 वाजता काँग्रेसला भेटण्यास बोलावलं असून, काँग्रेस या भेटीदरम्यान सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी (11 डिसेंबर) रात्रीच आनंदीबेन पटेल यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार मध्य प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला दुपारी 12 वाजता भेटण्याची वेळ दिली आहे. काँग्रेसकडून शिष्टमंडळात कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, विवेक तन्खा यांचा समावेश असणार आहे.