तेलंगणातीलकाँग्रेस सरकारने शनिवारी राज्यात पहिले जातनिहाय सर्व्हेक्षण सुरू केले आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मोठे विधान समोर आले आहे. 'देशात व्यापक जातनिहाय जनगणना करण्याची भाजपची इच्छा नाही,' असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत म्हटले आहे, "मोदी जी, आजपासून तेलंगणामध्ये जातनिहाय मोजणी सुरू झाली आहे. यातून मिळणाऱ्या डेटाचा वापर आम्ही राज्यातील प्रत्येक वर्गाच्या विकासासाठी धोरण तयार करण्यासाठी करू. हे लवकरच महाराष्ट्रातही होईल. देशात एक व्यापक जनगणना करण्याची भाजपची इच्छा नाही, हे सर्वांना माहीत आहे." राहुल गांधी यांनी पुढे लिहिले, "मी मोदीजींना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, तुम्ही देशातील जातवार जनगणना थांबवू शकत नाही. आम्ही याच संसदेत जातवार जनगणना पास करू आणि आरक्षणाची 50% मर्यादाही तोडू."
5 नोव्हेंबरला झाली होती बैठक -तेलंगणा सरकारने शनिवारी जातनिहाय जनगणना सुरू केली आहे. सांगण्यात येते की, येत्या काही आठवड्यात 80,000 गणनाकर्ते 33 जिल्ह्यांतील 1.17 कोटी घरांचे सर्वेक्षण करतील. यापूर्वी काँग्रेसने 5 नोव्हेंबर रोजी तेलंगणात जातनिहाय सर्वेक्षणासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते.