नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून विविध आश्वासने लोकांना देऊऩ आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेसकडून गरिबांसाठी आणलेली न्याय ही योजना मोदी सरकराने बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम करेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
न्याय योजनेचं उद्देश देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देणे आहे त्याचसोबत देशातील अर्थव्यवस्था बिघडली आहे तिला पूर्वपदावर आणण्यासाठी या योजनेचा वापर होईल असं राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षातील नोटबंदी, जीएसटी अशा निर्णयांनी देशातील अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. असंघटीत क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. मागील 5 वर्ष नरेंद्र मोदींनी गरिबांना काहीच दिलं नाही, गरिबांना लुटण्याचं काम या सरकारने केले म्हणून हा योजनेचे नाव न्याय असं ठेवण्यात आल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी शेतकरी, छोटे व्यापारी, बेरोजगार तरुण यांना देशोधडीला लावले, ज्या वंचित समाजाला लुटण्याचं काम मोदींनी केलं आम्ही त्या प्रत्येक घटकाला ते पुन्हा परत देणार आहोत. न्याय योजना आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. सर्व अभ्यास करून ही योजना आणली आहे. न्याय योजना आणताना अर्थ विश्लेषक, या क्षेत्रातील तज्ज्ञ सगळ्यांचा अभ्यास करुनच घोषित केली आहे असंही राहुल यांनी सांगितले. न्याय योजना आणल्याने भाजपा घाबरली आहे. पंतप्रधानांनी आपलं काम व्यवस्थित केलं असतं तर गरिबी संपली असती मात्र तसं झालं नाही. न्याय योजनेने देशाच्या आर्थिक व्यवस्थेला बळ मिळेल असा दावाही राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
दरम्यान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याय योजनेवर सडकून टीका केली. ज्यांना गरिबांचे बॅंकेत खाते खोलता आले नाही ते लोक गरिबांना पैसे काय देणार? असा टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला.