नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आता भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीतून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. मोदींना पराभूत करून त्यांची गुजरातला रवानगी करणार असल्याचे आजाद यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी चंद्रशेखर आजाद यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी प्रियंका यांच्यासोबत ज्योतिरादित्य सिंधीया, राज बब्बर होते. अचानक तब्येत बिघडल्यामुळे आजाद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
प्रियंका आणि आजाद यांनी ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी प्रियंका आल्या होत्या, असंही आजाद यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध आपण वाराणसीतून संघटनेतील मजबूत व्यक्ती उभा करणार आहोत. परंतु योग्य उमेदवार न मिळाल्यास खुद्द मोदी यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे आजाद यांनी स्पष्ट केले. त्यांनी एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला असून त्यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यावर निशाना साधला. देवबंद येथील आपली पदयात्रा योगी अदित्यनाथ यांनीच रोखली होती असंही त्यांनी सांगितले.
चंद्रशेखर पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भीम आर्मीचा मायावती यांना पूर्णपणे पाठिंबा राहिल. तर अखिलेश यादव यांनी पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी.
प्रियंका गांधी यांचा भाजपवर हल्लाबोलचंद्रशेखऱ आजाद यांच्या सूरात सूर मिळवत प्रियंका गांधी यांनी देखील यावेळी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशातील सरकार अहंकारी आहे. हे सरकार युवकांचा आजाव दाबण्याचा प्रयत्न करत आहे. युवकांना रोजगार दिला नाही, त्यामुळे युवक संघर्ष करत असल्याचे प्रियंका यांनी म्हटले.