नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप व सहयोगी पक्षांना ७५ टक्के जागा मिळतील, असा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी केला. राष्ट्रवादीचे नेते उदयन राजे भोसले यांनी शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी शहा बोलत होते. उदयन राजे यांनी शुक्रवारी रात्री लोकसभाध्यक्षांकडे खासदारकीचा राजीनामा दिला.उदयन राजेंच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला पुन्हा बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फडणवीसांनी महाराष्ट्राचे हरवलेले वैभव परत आणण्याचे काम केले. राज्यातील जनता मनाने पंतप्रधानांसोबत आहे. जनता यंदाही कौल देईल, असे शहा म्हणाले. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उदयन राजे हे छत्रपतींच्या घराण्यातील असल्याने देश प्रथम अशी त्यांची भूमिका आहे. यापूर्वी छत्रपती संभाजी राजे, समरजित घाडगे, शिवेंद्रराजे आमच्याकडे आले. आता राजे पक्षात आल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेने लोकाभिमुख कार्य करण्यात सरकारला मदत मिळेल, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.>विरोधी पक्षात असून जी कामे झाली, ती सत्तेत असताना झाली नाहीत. कामांच्या फायली कचरापेटीत जायच्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या क्षेत्रांतच कामे झाली. देवेंद्र फडणवीसांच्या काळात १५ वर्षांपासूनची प्रलंबित कामे मार्गी लागली. लोकसभा निवडणूक जरी जिंकलो, तरी तो माझा वैयक्तिक पराभव होता. पक्षात अडवा व जिरवा हे धोरण राबवले गेले. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षांतरामागे हेच कारण आहे. -उदयन राजे
महाराष्ट्रातील ७५ टक्के जागा जिंकू -अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 4:49 AM