नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचे सरकार येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. एवढे मोठे यश 1955 पासून सत्तेत असलेल्या भाजपाला पहिल्यांदाच मिळाले आहे. मागील वेळी भाजपाला 99 आणि काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी काँग्रेस टक्कर देईल अशी आशा होती. परंतु 'आप'ला मतदान मोठ्या प्रमाणावर झाल्याने काँग्रेसचे मनसुबे उधळले गेल्याचे दिसत आहेत. दरम्यान, निकाल समोर आल्यानंतर कॉंग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी यांनी गुजरातच्या जनतेसाठी लढत राहू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाने विजयाकडे कूच केली आहे. भाजपा 184 पैकी 158 जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. तर कॉंग्रेसने 16 जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय आम आदमी पक्षाने कॉंग्रेसला धक्का देत 5 जागा जिंकल्या आहेत. अशातच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून गुजरातच्या जनतेने दिलेला कौल स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. "गुजरातच्या जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी आम्ही पुनर्बांधणी करू, कठोर परिश्रम करू आणि लढत राहू." अशा शब्दांत राहुल गांधी यांनी गुजरातच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
भाजपाने रचला इतिहास"भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास रचला आहे. आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने 157 च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे. 27 वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरी गेली. विरोधी पक्षांना वाटले 27 वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचे मी म्हटले होते. ते निकालातून दिसले" असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
'आप'च्या आक्रमक निवडणूक प्रचारामुळे यावेळी भाजपाला गुजरातमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागली असे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 10 हून अधिक केंद्रीय मंत्री, चार मुख्यमंत्री, तीन राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि विविध राज्यांच्या 50 हून अधिक मंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फक्त पंतप्रधानांनी गुजरातमध्ये 39 सभा घेतल्या आणि 134 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले. पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनीही गुजरात निवडणुकीत पूर्ण ताकद लावली. शाह यांनी 23 रॅलींद्वारे 108 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"