नवी दिल्ली - देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. आम्ही काश्मीरमध्ये विकास कामांना सुरुवात केली आहे. परंतु जोवर आम्ही गिलगित-बलुचिस्तानपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत थांबणार नाही असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात घेण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर परत घेणे हा संसदेचा संकल्प आहे. त्याठिकाणी लोक पाकिस्तानच्या विरोधात आहेत अशी परिस्थिती आहे. पाकिस्ताननं पीओकेमध्ये जे काही केलंय त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. पाकिस्तान त्यांच्या ताब्यात असलेल्या काश्मीरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत असं त्यांनी सांगितले.
संरक्षण मंत्र्यांचे हे विधान अलीकडेच लष्कराचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्रिवेदी यांच्या विधानानंतर आले आहे. द्विवेदी यांनी म्हटलं होतं की, सरकारचे जे काही आदेश असतील त्याचे पालन केले जाईल. आम्ही कुठल्याही कारवाईला तयार आहोत. सरकारचे जसे आदेश येतील त्या हिशोबाने काम फत्ते केले जाईल. जर पाकिस्ताननं सीझफायरचं उल्लंघन केले तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ. सीमेवर शांतता राहावी यासाठी दोन्ही देशांची जबाबदारी आहे. परंतु जर पाकिस्तान कुठलेही पाऊल उचलत असेल तर त्याला परिणाम भोगण्याची तयारी ठेवायला हवी असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला.
गेल्या काही दिवसापूर्वी घुसखोरी करत असताना एक पाकिस्तानी मारला गेला, तर दुसऱ्या घटनेत आणखी एका घुसखोराला अटक करण्यात आले आहे. जवानांनी मागील सोमवारी पहाटे जम्मूच्या अरनिया सेक्टर आणि सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नांना हाणून पाडले. घुसखोरांनी जवानांचे ऐकले नाही, त्यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला. आणखी एका घटनेत, रामगढ सेक्टरमधील कुंपणाजवळ आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आलेल्या पाकिस्तानी घुसखोराला सैन्याने अटक केली. गेट उघडल्यानंतर त्याला भारतीय बाजूच्या कुंपणाजवळ आणण्यात आले, असं एका अधिकाऱ्याने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"