नवी दिल्ली - हे निर्ढावलेले लोक आहेत. शुभेच्छा देणे ही आपली संस्कृती आहे. माझ्यासारख्या माणसाने जर माझ्या वडिलधाऱ्यांच्या पाठित खंजीर खुपसला असता तर डोळ्याला डोळे भिडवण्याची हिंमत झाली नसती. आम्ही असं काम केले असते तर आमचा धीर झाला नसता असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी नेते मंडळीच्या शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांची भेट उद्धव ठाकरे गटाला खटकली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजित पवारांनी आज दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, पार्थ पवार उपस्थित होते. या भेटीवर संजय राऊत म्हणाले की, आम्ही आमच्या स्वार्थासाठी चूक केली असती तर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नजरेला नजर भिडवायची हिंमत झाली नसती. मला लाजही वाटली असती. परंतु हे माझे वैयक्तिक मत आहे. मी त्या नेत्यांविषयी व्यक्तिगत बोलत नाही. मी माझ्या भावना आणि आमच्या पक्षातल्या भावना सांगितल्या. आपण महान माणसाविरोधात प्रचार केला. चिखलफेक केली आणि परत शुभेच्छा द्यायला येता हे माझे मत सांगतोय, महाराष्ट्राला किती आवडेल माहिती नाही पण माझे मन झाले नसते आणि मी नजरेला नजर भिडवू शकलो नसतो असं त्यांनी सांगितले.
तसेच शरद पवारांचा आज वाढदिवस, ते महाराष्ट्राचा आधारवड आहेत. देशाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात जे पवारांचे योगदान आहे ते अतुल्यनीय आहे.आम्हाला त्यांचे मार्गदर्शन अनेकदा मिळाले आहे. एकत्रित काम करतो. त्यामुळे त्यांना दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे ही सगळ्यांची इच्छा असते. दरवेळी ते महाराष्ट्रात वाढदिवस साजरा करतात. यावेळी संसदेच्या अधिवेशनामुळे ते दिल्लीत आहेत. आम्ही शिवसेनेचे सगळेच खासदार, काँग्रेसचे खासदार इतर नेते यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्यात असं संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, आम्ही जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा साधे घर दिले होते. सुनेत्रा पवारांना ११ जनपथवर टाईप VII चं घर देऊन अजित पवारांची दिल्लीत येण्याजाण्याची सोय केली आहे. भाजपा सरकार हे सगळे मुद्दाम करते. नेत्यांना कमी लेखण्यासाठी हे करते. दिल्ली ही कारस्थानाची राजधानी आहे. दिल्लीत जेवढे कपट कारस्थान चालते तेवढे जगात कुठे चालत नसेल. त्यामुळे हे जे काही घर दिलंय ते मुद्दाम दिलंय असा आरोप संजय राऊतांनी केला.
सरकारला लाज वाटली पाहिजे
येत्या २० तारखेला महिना होईल तरीही मंत्रिमंडळ बनत नसेल आणि महाराष्ट्रात रोज हत्या सुरू आहेत. सरकारला लाज वाटली पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे नाकाने कांदे सोलतायेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना महाराष्ट्रात काय सुरू आहे माहिती आहे का, राज्यात रोज खून होतायेत, दंगली होतायेत आणि ते आम्हाला अक्कल शिकवतायेत असा टोला संजय राऊतांनी महायुतीला लगावला.