श्रीनगर:जम्मू-काश्मीर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे सोडलेल्या शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. पाकिस्ताकडून ड्रोनने टाकलेल्या पॅकेटमधून एक AK-47, तीन पाकिस्तानी मासिकं, 30 काडतूस आणि एक दुर्बिण जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या फलाईन मंडळाच्या सौंजना गावात हे शस्त्र टाकण्यात आले होते.
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून शस्त्रसाठा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सौंजना गावात पोलिसांनी गावाला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली होती. त्यादरम्यान वायरच्या सहाय्याने बांधलेले पिवळे पॅकेट सापडले. त्यात ही शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, हे पॅकेट भारतात कोण घेणार होते, त्याचा शोध सुरू आहे.
ड्रोन कारवायात वाढपाकिस्तानकडून ड्रोनच्या कारवायांमध्ये गेल्या एक वर्षात चिंताजनक वाढ झाली आहे. यामुळे भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा दलासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. गेल्या वर्षभरात सुरक्षा दलांनी दोन ड्रोन पाडले असून, अनेक रायफल, अत्याधुनिक उपकरणे, बॉम्ब आणि मादक द्रव्ये यासह मोठ्या प्रमाणात पेलोड जप्त केला आहे. या वर्षी जूनमध्ये जम्मूच्या भारतीय हवाई दलाच्या स्टेशनवर एका ड्रोनने दोन बॉम्ब टाकल्यानंतर सीमेवरील सुरक्षा ग्रिड देखील तीव्र करण्यात आली होती.
या वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यातही पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न केला होता. ही शस्त्रे पॉलिथीनच्या पॅकेटमध्ये सीलबंद ठेवून पाठवण्यात आली आहेत. पण, ही शस्त्रे बीएसएफ जवानांनी ताब्यात घेतली. त्यात Ak-47 रायफल, 9 एमएम रायफल, एक पिस्तूल, 15 काडतूस जप्त करण्यात आली होती.