नवी दिल्ली : ओडिशामध्ये हाहाकार माजविणारे फोनी चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याच्या आधी १३ दिवस हवामान खात्याने याचा इशारा दिला होता. बंगालची खाडी व विषुववृत्तीय हिंद महासागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा भीषण चक्रीवादळाचे रौद्र रूप घेईल, अशा इशारा देत यावर बारकाईने लक्ष ठेवले होते. त्यामुळेच राज्य सरकारने पुरेपूर खबरदारी घेतली होती व कमीत कमी नुकसान कसे होईल, याकडे लक्ष पुरवत सज्जता ठेवली होती.हवामान खात्याने २१ एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारावर चक्रीवादळाचे भाकीत केले होते. कमी दाबाचा पट्टा तयार होणे, ही चक्रीवादळाची पहिली पायरी समजली जाते.चक्रीवादळाचे तज्ज्ञ असलेले हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक (सेवा) मृत्युंजय महापात्रा यांनी फोनीच्या हालचालींबाबत माहिती देण्यात व अचूक अंदाज काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी सांगितले की, आमच्या सर्व मानकांनुसार कमी दाबाचा पट्टा भयंकर चक्रीवादळात रूपांतरित होणार आहे, हे सिद्ध होत होते. यासाठी २५ एप्रिलपासून आम्ही विशेष बुलेटिन जारी करणे सुरू केले होते.पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अन्य संस्थांनी केलेल्या मदतीमुळे चक्रीवादळाबाबत अचूक अंदाज वर्तविण्यात आला. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओशन टेक्नॉलॉजी, चेन्नईची बंगालची खाडी व अरबी समुद्रात २० पेक्षा अधिक उपकरणे बसवलेली आहेत. त्यांनी दिलेले पाऊस, समुद्राच्या तापमानातील चढ-उतार व हवेची गती याबाबतचे आकडे एकत्रित करण्यात आले. हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी सांगितले की, समुद्रावरील ढगांसह विविध आकड्यांनी कमी दाबाच्या प्रणालीवर निगराणी ठेवण्यासाठी विविध उपग्रहांची मदत मोलाची ठरली. चेन्नई, करिकल, मछलीपट्टणम, विशाखापट्टणम, गोपालपूर, पारादीप, कोलकाता, अगरतलामध्ये लावलेल्या रडारची निरीक्षणेही उपयोगी पडली. फोनी धडकण्यापूर्वी १२ तास आधी हवामान खात्याने संबंधित ठिकाणी प्रत्येक अर्ध्या-अर्ध्या तासाला ताजी माहिती दिली व याशिवाय प्रत्येक तासाला बुलेटिन जारी केले. फोनीने २८ एप्रिल रोजी चक्रीवादळाचे रूप धारण केले. पुढे चालून ते भीषण चक्रीवादळ तीन मे रोजी १७५ ते २०० किलोमीटर वेगाने ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले; परंतु आधीच मिळालेल्या इशाऱ्यामुळे ओडिशा सरकारने खबरदारी घेतली होती व किनारपट्टीवरील सुमारे ११ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते.
फोनी धडकण्यापूर्वी १३ दिवस आधी दिला होता हवामान खात्याने इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 5:17 AM