Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. दिल्लीत-एनसीआरमध्ये तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर कंबरेपर्यंत पाणी साचत आहे. या पावसामुळे अनेकांना आपला जीवही गमावला आहे. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही असाच पाऊस पडणार का, याबाबत हवामान खात्याने मोठा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याने पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शिवाय नागरिकांना सावधानतेचा इशाराही दिला आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी (1 ऑगस्ट) वर्तवला. IMD ने सांगितल्यानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यान देशभरात पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल. 1 जूनपासून देशात 453.8 मिमी पाऊस झाला आहे, तर सामान्य पाऊस 445.8 मिमी आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा 2 टक्के जास्त आहे.
देशातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस
आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा म्हणाले, देशातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. पण, पूर्व भारताला लागून असलेल्या ईशान्य, लडाख, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागात तसेच मध्य आणि द्वीपकल्पीय भारतातील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत कुठे किती पाऊस झाला?
IMD च्या आकडेवारीनुसार, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, गंगा मैदान आणि ईशान्येकडील काही भागात कमी पाऊस झाला आहे. तर हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये 35 ते 45 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. गंगा मैदाने, मध्य भारत आणि भारताच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीच्या काही भागात तापमान सामान्य आणि कमाल तापमानापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.