नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत हरवलेला अथवा चोरी गेलेला मोबाईल शोधणे सोपे होणार आहे. सोमवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत एका नवीन पोर्टलचे उद्घाटन केले.
www.ceir.gov.in असे या पोर्टलचे नाव आहे. आता मोबाईल चोरीला किंवा हरवला असेल तर त्यासंदर्भातील माहितीचा पोलीस तपशील आणि IMEI नंबरची माहिती या नव्या पोर्टलवर दिली जाणार आहे. या पोर्टलवर माहिती आल्यास मोबाईल ब्लॉक होईल. म्हणजेच सीम बदलल्यानंतरही त्या मोबाईलवरून कॉल जाणार नाहीत. मुंबईत पायलट प्रोजेक्टचा आढावा घेतल्यानंतर दिल्लीत हे पोर्टल लाँच करण्यात आले.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 5 जी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी दिले. ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून देशात लवकरच 5 जी नेटवर्क सुविधा सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सैद्धांतिक निर्णय घेतला आहे. लवकरच हा पायलट प्रोजेक्ट अंमलात आणला जाईल.'
5 जी साठी नवीन पायलट प्रोजेक्टची जिम्मेदारी संचार सचिव अंशु प्रकाश यांच्याकडे दिली आहे. आधार तर फिजिकल ओळखीचा डिजिटल पुरावा आहे. यावरून कारण नसताना वादविवाद होत आहेत. डिजिटल प्रशासनामार्फत आम्ही देशाचे 978 मिलियन डॉलर वाचविले आहेत, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. याचबरोबर, मोबाईल फोनची सेफ्टी सिक्युरिटी सर्वाधिक गरजेची आहे, असेही केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.