नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या संरक्षण, गृह आणि कायदा मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर या वेबसाइट्स हॅक झाल्या नाहीत, अशी माहिती नॅशनल सायबर सुरक्षा विभागाचे समन्वयक गुलशन राय यांनी दिली आहे.
वेबसाइट्स हॅक झाल्याच्या बातमीनंतर नॅशनल सायबर सुरक्षा विभागाने दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत संरक्षण, गृह आणि कायदा मंत्रालयाची वेबसाइट्स हॅक केल्याचे नाकारले. नॅशनल सायबर सुरक्षा विभागाचे समन्वयक गुलशन राय यांनी असे सांगितले की हा प्रश्न हार्डवेअरचा होता व तो लवकरच दुरुस्त केला जाईल. दरम्यान, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनीच संकेतस्थळ हॅक झाल्याच्या बातम्यांना दुजोरा देणारे पहिले ट्विट केले होते. त्यानंतर काही वेळाने नॅशनल सायबर सुरक्षा विभागाकडून वेबसाइट्स हॅक केल्या नाहीत असे सांगण्यात आले.
दरम्यान, आज संध्याकाळी साडेचार वाजता संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट https://mod.gov.in हॅक झाल्याची माहिती समोर आली. वेबसाइट ओपन केल्यानंतर होम पेजवर चिनी अक्षरं दिसत असल्याने चिनी हॅकर्सने ही वेबसाइट हॅक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. वेबसाइट ओपन होण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत आहे. वेबसाइट हॅक केल्यानंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. वेबसाइट लवकरच पूर्ववत करण्यात येईल. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी महत्त्वाची पावलं उचलली जातील, अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे.