त्रिची : विवाह ही आयुष्यातील मोठी घटना असते. त्यामुळे लग्नाच्या स्मृती जपून ठेवण्यासाठी ‘व्हिडीओ’ चित्रीकरण करण्यात येते, परंतु याच चित्रीकरणावरून मांडव उठला, तर कोणाला खरे वाटणार नाही, परंतु त्रिचीतील थुरैयार येथे अशी घटना घडली. वरपक्षाने लग्न सोहळ्याचे चित्रीकरणासाठी व्हिडीओग्राफरची व्यवस्था न केल्यामुळे, वधू पक्षाने ऐन वेळी विवाह मोडला व एवढेच नाही, तर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रारही दाखल केली. मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे, असा वधूपित्याचा आग्रह होता, तर लग्नसोहळ्यावर जास्त खर्च नको, अशी वरपक्षाची भूमिका होती. मोठ्या मंगल कार्यालयात लग्न लागावे, असे वधूपित्याला वाटत असताना वराकडील मंडळींनी छोटे मंगल कार्यालय निश्चित केले. त्यामुळे वधूकडील मंडळी नाराज झाली होती. मात्र, लग्नाच्या दिवशी व्हिडीओग्राफर दिसत नसल्यामुळे धुसफूस सुरू झाल्यानंतर, वरपक्षाने ऐन वेळी धावपळ करीत एका व्हिडीओग्राफरची सोय केली. तथापि, तो लग्नमंडपात येईपर्यंत अक्षता पडल्या होत्या आणि वर आणि वधू पक्षात जुंपली होती. वधू व वर जवळचे नातेवाईक आहेत, हे विशेष. पाहुण्या मंडळींनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र, विवाह सोहळ्यात सर्व पाहुण्यांसमोर आपल्या पित्याचा अपमान झाल्याचे सांगून, वधूने लग्न मोडल्याचे जाहीर केले. (वृत्तसंस्था)>लग्नाची छायाचित्रे काढण्याचे व चित्रीकरण करण्याचे वरपक्षाने कबूल केल्यामुळे वधूकडील मंडळींनी छोट्या मंगल कार्यालयाचा प्रस्ताव मान्य केला होता. मात्र, त्यांनी व्हिडीओग्राफरची व्यवस्था केली नाही.
व्हिडीओग्राफीअभावी वधूने मोडले लग्न
By admin | Published: June 28, 2016 6:09 AM