प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये आठवडा अखेरच्या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे शनिवारी भाविकांची गर्दी वाढली. या दिवशी तिथे सुमारे एक कोटी लोकांनी पवित्र स्नान केल्याचे सूत्रांनी सांगितले. १३ जानेवारीपासून महाकुंभात ५० कोटींपेक्षा अधिक लोकांनी पवित्र स्नान केले आहे. १३ जानेवारीला सुरू झालेला हा महाकुंभ २३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाकुंभ मेळ्यात शनिवारी पवित्र स्नान केले. भाजपाचे आमदार हर्षवर्धन वाजपेयी यांना व्हीआयपी घाटावर जाण्यापासून सुरक्षा जवानांनी रोखले. मात्र, नंतर त्यांना घाटावर प्रवेश मिळाला. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही पवित्र स्नान केले.
महाकुंभ मेळ्यात हरविलेल्यांपैकी २० हजार जणांची त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट झाली. ही कामगिरी उत्तर प्रदेश सरकारने बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी स्थापन केलेल्या डिजिटल केंद्रांनी केली आहे. त्यामध्ये एआय-आधारित फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजी, मशीन लर्निंग अशा गोष्टींनी सुसज्ज आहे.
आगीची चौथी घटना
महाकुंभनगरातील सेक्टर १८ व १९मध्ये आग लागून काही तंबू भस्मसात झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र, तिथे भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे अग्निशमन दलाचे जवान आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यात काही अडथळे आले. मेळा सुरू झाल्यापासून त्या परिसरात आग लागण्याची ही चौथी घटना आहे.
तीन अपघातांत १५ ठार
महाकुंभ भाविकांच्या दोन वाहनांना उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये झालेल्या तीन स्वतंत्र अपघातांत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. महाकुंभमध्ये पवित्र स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची बोलेरो कार व बस यांच्यात प्रयागराजनजीक शुक्रवारी रात्री धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाला.
तर उत्तर प्रदेशमध्येच बसला अचानक आग लागून भाविकाचा होरपळून मृत्यू झाला. तसेच महाकुंभाहून घरी परतणाऱ्यांची व्हॅन व ट्रक यांची गुजरातमधील दाहोद जिल्ह्यात शनिवारी टक्कर होऊन चार जण ठार व सहा जण जखमी झाले.